एएसपीएस पत्नीला धक्कादायक व्हिडिओ: सोशल मीडियामध्ये एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. ज्यामध्ये एक आई आपल्या मुलाच्या चेहरा उशीने दाबण्याचा प्रयत्न करतेय. ऑटिझम असल्याने तो मुलगा आपल्या आईला प्रतिकार करु कत नाही. पण समोर दुसरं लहान बाळ हे कृत्य पाहून खूपच घाबरलंय. ते इकडे तिकडे पळण्याचा प्रयत्न करतंय. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
लखनऊमधील अतिरिक्त पोलीस अधीक्षक (एएसपी) मुकेश प्रताप सिंह यांच्या पत्नी नितेश सिंह यांच्या आत्महत्येप्रकरणी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. नितेश सिंह यांनी आत्महत्या करण्यापूर्वीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ उघडकीस आला आहे, ज्यामध्ये त्या आपल्या अपंग मुलाच्या चेहऱ्यावर उशी दाबताना आणि त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ 29 जुलैचा असल्याचे सांगितले जाते, जो आत्महत्येच्या एक दिवस आधीचा आहे. या फुटेजमुळे नितेश आणि त्यांचे पती मुकेश प्रताप सिंह यांच्यातील वाद उघड झालाय.
काय आहे नेमक प्रकरण?
सीसीटीव्ही फुटेजनुसार, नितेश सिंह यांनी आपल्या अपंग मुलाला उशीने चेहरा दाबून आणि नंतर त्याचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा व्हिडिओ पाहून मुकेश प्रताप सिंह यांनी आपल्या मोबाइलवर सीसीटीव्ही फुटेज तपासले. ज्यामुळे त्यांच्यात आणि नितेश यांच्यात तीव्र वाद झाला. नितेश सिंह या मुलाच्या ऑटिझमच्या आजारामुळे मानसिक तणावात होत्या आणि त्यांच्यावर मानसोपचारतज्ज्ञांकडून उपचार सुरू होते. मुलावर लक्ष ठेवण्यासाठी मुकेश यांनी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली.

कशी समोर आली आत्महत्येची घटना?
बुधवारी संध्याकाळी नितेश सिंह यांनी लखनऊ येथील पोलीस लाइन परिसरातील त्यांच्या निवासस्थानी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. कुटुंबीय आणि नितेश यांचा भाऊ यांनी मुकेश प्रताप सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुकेश यांचे एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते, ज्यामुळे नितेश यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा दावा नितेशच्या भावाने केला होता.
घटनेची पार्श्वभूमी काय?
मुकेश प्रताप सिंह हे सीबीसीआयडीमध्ये अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचे कुटुंब लखनऊच्या पोलीस लाइन परिसरात राहते. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच सुमारे 10 दिवसांपूर्वी त्यांना या परिसरात निवासस्थान मिळाले होते. यानंतर त्यांच्या घरात आत्महत्येचा प्रकार समोरआला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, सीसीटीव्ही फुटेजमुळे या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
घटनेचे पडसाद?
हा व्हिडिओ आणि त्यामागील घटनाक्रम पाहता, नितेश सिंह यांच्या मानसिक स्थितीवर आणि कौटुंबिक वाद प्रकर्षाने समोर येतो. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेजने सत्य उघड केलंय. यामुळे समाजात आणि कुटुंबात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी सुरू केली आहे. या घटनेचे पडसाद कायदेशीर आणि सामाजिक स्तरावर कसे पडतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
































