टाळेबंदीत: जगभरातील प्रमुख आस्थापना मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. एआयचा अविष्कार झाल्यानंतर कंपन्यानी तंत्रज्ञानाचा वापर वाढवला आणि मनुष्यबळ कमी करायला सुरुवात केली. एक्स म्हणजेच आधीचे ट्विटर, अमेझॉन अशा दिग्गज कंपन्या यात पुढे होत्या. दरम्यान आता नासा (NASA) ने देखील यात पुढाकार घेतलाय. नासातील 2145 हून अधिक अनुभवी शास्त्रज्ञ आणि वरिष्ठ कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरु आहे. यापैकी 1818 लोक मानवी अंतराळ मोहिमा आणि वैज्ञानिक शोधांचा कणा मानल्या जाणाऱ्या विभागांशी संबंधित आहेत.
नोकरी गमावणारे सर्वजण त्यांच्या क्षेत्रातील उच्च पदांवर आहेत आणि विशेष जबाबदाऱ्यांसह काम करत होते. अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने अनेक विभागांमध्ये बजेट कपातीच्या नावाखाली संघीय संस्थांचा आकार कमी करण्यासाठी मोहीम सुरू केली आहे. आणि नासाला सर्वात मोठा धक्का बसलाय. पॉलिटिकोने यासंदर्भात अहवाल दिलाय.
उपक्रमांचे बजेट 47% ने कमी करण्याचा निर्णय
‘आम्ही बजेट प्राधान्यांमध्ये राहून आमच्या मोहिमेसाठी वचनबद्ध आहोत’, अशी माहिती नासाच्या प्रवक्त्या बेथानी स्टीव्हन्स यांनी वृत्तसंस्था रॉयटर्सला दिलीय पण गोष्टी इतक्या सोप्या नाहीत हे अंतर्गत गोंधळ स्पष्टपणे दिसतंय. नासाच्या अनेक माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या निर्णयाला विरोध करणारे भावनिक पत्र अमेरिकन काँग्रेसला लिहिले आहे. व्हाईट हाऊसने विज्ञान उपक्रमांचे बजेट 47% ने कमी करण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय अमेरिकेच्या अंतराळ नेतृत्वाच्या शवपेटीत खिळा ठोकल्यासारखे आहे, असे त्यांनी या पत्रात म्हटलंय
चीनबद्दल चिंता व्यक्त
‘मंगळावर कारएवढा मोठा रोव्हर उतरवणे, अवकाशात महाकाय दुर्बिणी तैनात करणे, सूर्याजवळून जाणारे अंतराळयान तयार करणे आणि हबल दुर्बिणीच्या आश्चर्यकारक फोटोंसह लोकांना प्रेरित करणे यासारखी अशक्य वाटणारी उद्दिष्टे कशी शक्य केली हे आम्ही पाहिलंय.’ पत्रात चीनची वेगाने प्रगती करणारी अवकाश विज्ञान रणनीतीवर चिंता व्यक्त करण्यात आली. ‘जेव्हा चीन सौर मंडळाच्या प्रत्येक कोपऱ्यात, नेपच्यूनला प्रवास करण्यापासून ते हवामान बदलाचे निरीक्षण करण्यापर्यंत आपली मोहीम पाठवतय. तर जर अमेरिका मागे हटली तर ते केवळ विज्ञानाचेच नाही तर भविष्याचेही नुकसान होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात म्हटलंय.
कर्मचारी कपात
जानेवारी 2025 मध्ये ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यापासून अमेरिकन अंतराळ संस्था आणि नासाच्या 18 हजार कर्मचाऱ्यांना वाढत्या अनिश्चिततेचा सामना करावा लागतोय. यापूर्वी अमेरिकन सरकारी टेलिव्हिजन चॅनेल व्हॉइस ऑफ अमेरिकामध्येही कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ट्रम्प यांनी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. आजही व्हॉइस ऑफ अमेरिकाच्या वेबसाइटवर 15 जूनची बातमी पाहिली दिसतेय. कारण तिथे तक्रार करण्यासाठी कोणीही नाही.























