दलाई लामा जन्म रहस्य: सर्वोच्च बौद्ध धर्मगुरू आणि तिबेटचे नेते दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्यांवरून वाद वाढत आहे. चीनने म्हटले आहे की दलाई लामा यांचा उत्तराधिकारी निवडताना त्यांची संमती घेणे आवश्यक आहे. मात्र, दलाई लामा यांनी हे नाकारले आहे. दलाई लामा त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या उत्तराधिकारी आणि पुनर्जन्माबद्दल मोठी घोषणा करू शकतात. दलाई लामा काय घोषणा करतात याकडे चीनचे लक्ष आहेत. दलाई लामा यांनी उत्तराधिकारी ‘गोल्डन कलश’ पद्धतीने निवडला जावा अशी चीनची मागणी आहे. परंतु दलाई लामा यांनी चीनचा प्रस्ताव नाकारला आहे. भविष्यात जन्माला येणारे मूल दलाई लामांचा अवतार असू शकतो. पुनर्जन्मानंतर हे नेमकं कसं ठरवले जाते? जाणून घेऊया.
पुढील तिबेटी आध्यात्मिक नेते दलाई लामा यांची निवड त्यांच्या संघटनेच्या गादेन फोडरंग ट्रस्टकडून केली जाईल आणि हे ट्रस्ट त्यांच्या पुनर्जन्माला मान्यता देण्याबाबतही निर्णय घेईल असे दलाई लामा यांनी स्पष्ट केले आहे. दलाई लामा यांची निवड कशी केली जाते आणि पुनर्जन्मानंतर भविष्यात जन्माला येणारे मूल दलाई लामांचे अवतार असेल हे कसे ठरवले जाते जाणून घेऊया.
तिबेटी बौद्ध धर्माच्या मान्यतेनुसार, दलाई लामा यांचा पुनर्जन्म होतो. म्हणजेच, जेव्हा दलाई लामा यांचे निधन होते, तेव्हा ते भविष्यात बालक म्हणून जन्माला येतात. या मुलाचा शोध पूर्ण झाल्यानंतरच दलाई लामाची घोषणा केली जाते. हा शोध गादेन फोडरंग ट्रस्टच्या अधिकाऱ्यांकडून केला जातो. सामान्यतः पुढील दलाई लामाचा शोध सध्याच्या दलाई लामा यांच्या मृत्यूनंतर केवळ 9 महिन्यांनी सुरू होतो.
ते मूल खरोखर दलाई लामा यांचा अवतार आहे हे कसे ठरवले जाते?
जन्माला आलेले मुल दलाई लामाचा अवतार आहे किंवा दलाई लामांचा पुनर्जन्म झालाय हे ज्या पद्धतीने ठरवले जाते ती पद्धत खूपच रंजक आहे. यासाठी अनेक प्रकारच्या प्रक्रियांचा अवलंब केला जातो. दलाई लामांचा उत्तराधिकारी शोधताना, संघटनेचे अधिकारी अनेक पद्धतींचा अवलंब करतात, ज्यामध्ये भविष्यवाणी, सध्याच्या दलाई लामा यांनी शेवटच्या क्षणी दिलेले संकेत आणि त्यांच्या मृत शरीराची स्थिती देखील महत्त्वाची असते.
या दरम्यान, अनेक संभाव्य मुलांची चाचणी घेतली जाते. या मुलांना मागील दलाई लामाच्या अनेक गोष्टी दाखवल्या जातात. मूल त्या गोष्टी ओळखू शकते की नाही हे पाहिले जाते. जर मुलाला त्या गोष्टी ओळखता आल्या तर त्याला दलाई लामा मानले जाते, त्यानंतर पुढील दलाई लामाची घोषणा केली जाते. यानंतर, त्याला धार्मिक शिक्षण आणि इतर प्रशिक्षण दिले जाते. या प्रक्रियेअंतर्गत, सध्याच्या दलाई लामाची निवड देखील दोन वर्षांच्या वयात करण्यात आली होती. वयाच्या चौथ्या वर्षी त्यांना ल्हासा येथे आणण्यात आले. सध्याचे दलाई लामा 1959 पासून भारतात राहत आहेत आणि त्यांचे निर्वासित सरकार देखील येथूनच कार्यरत आहे.





























