देश : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भारतीय भाषांचं महत्त्व अधोरेखित करताना एक मोठं विधान केलं आहे. ते दिवस आता दूर नाहीत जेव्हा भारतामध्ये इंग्रजी बोलणाऱ्यांना लाज वाटेल असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी भारतीय भाषांना देशाच्या संस्कृतीचे रत्न असा उल्लेख करताना, या भाषा आपल्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असल्याचं म्हटलं आहे. तसंच या भाषांशिवाय आपल्याला भारतीय म्हणवू शकत नाही असंही ते म्हणाले.
दिल्लीत माजी आयएएस आशुतोष अग्निहोत्री यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना अमित शाह म्हणाले, “मी जे सांगत आहे ते लक्षपूर्वक ऐका आणि लक्षात ठेवा. या देशात इंग्रजी बोलणाऱ्या लोकांना लाज वाटेल अशा समाजाची निर्मिती फार दूर नाही. जे एकदा काहीतरी करण्याचा निर्णय घेतात तेच काही करू शकतात आणि मला विश्वास आहे की आपल्या देशाच्या भाषा आपले रत्न आहेत. त्यांच्याशिवाय आपण भारतीय नाही. तुम्ही तुमचा इतिहास, संस्कृती आणि धर्म परदेशी भाषेत समजू शकत नाही.”
पुढे म्हणाले की, “अपूर्ण परदेशी भाषांसह संपूर्ण भारताची कल्पना करता येत नाही. ही लढाई किती कठीण आहे याची मला पूर्ण जाणीव आहे. मला विश्वास आहे की भारतीय समाज ही लढाई जिंकेल आणि आपल्या भाषांचा अभिमान बाळगून आपण आपला देश चालवू, विचार करू, संशोधन करू, निर्णय घेऊ आणि जगावर राज्य करू. याबद्दल कोणालाही शंका घेण्याची गरज नाही”.
2047 मध्ये जगात अव्वल स्थानावर राहण्यात आपल्या भाषा मोठी भूमिका बजावतील असा विश्वासही यावेळी अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.





























