पुणे-पिंपरी चिंचवड (दि.१८) : “पिंपरी चिंचवड हे वेगाने वाढणारे शहर आहे. या शहराचा विकास सुनियोजित व्हावा यासाठी आगामी ५० वर्षांचे आराखडे तयार व्हावेत,” असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी चऱ्होली नगर रचना योजना रद्द करण्याचे स्पष्ट निर्देश दिले.
वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव महाराजांच्या भेटीच्या समूहशिल्पाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, महेश लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, “वारकरी संप्रदाय हा आपला वैश्विक विचार जपणारा आहे. वारी आहे तोपर्यंत विचार आहे. इंद्रायणी नदी निर्मळ ठेवण्यासाठी १००% सांडपाण्यावर प्रक्रिया होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.”

‘ज्येष्ठानुबंध’ आणि ‘ट्रॅफिक बडी’ या स्मार्ट पोलीस प्रणालींचे त्यांनी कौतुक केले. “माणुसकी हा खरा धर्म असून, या भावनेतून पोलिसांची नवी व्यवस्था कार्यरत आहे,” असे ते म्हणाले.
या वेळी विविध रस्त्यांचे डांबरीकरण, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, क्लायबिंग वॉल, नवीन शाळा इमारती, अग्निशमन केंद्र, वाहनतळ अशा अनेक सुविधा नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आल्या.
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी याचे प्रास्ताविक केले. “या प्रकल्पांमुळे नागरिकांना आधुनिक, सुरक्षित आणि शाश्वत सुविधा मिळतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सर्व प्रकल्पांचे लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यावेळी प्रकल्पांची माहिती देणारी व्हिडीओ चित्रफीतही सादर करण्यात आली.































