मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेला प्रत्यक्ष रूप
पुणे (दि.२४) : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या चरणसेवा शिबिरांना वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. पुणे शहरातील विविध १० ठिकाणी झालेल्या या शिबिरांमधून १५ हजारांहून अधिक वारकऱ्यांनी सेवा घेतली, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
पारगे चौक, कसबा गणपती, कस्तुरी चौक, नानापेठ, रामोशी गेट, सह्याद्री मैदान, गंगाधाम रोड, काशेवाडी, मार्केटयार्ड आणि गंगाधाम चौक या ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात आली होती. या शिबिरांमध्ये एकूण १ हजार ३७ विद्यार्थी आणि स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.
‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा’ या भावनेने प्रेरित होऊन ढोले पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, अष्टांग आयुर्वेद महाविद्यालय, भारती विद्यापीठ, संचेती महाविद्यालय, सिंहगड संस्था, रंगूनवाला कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, ब्रिजलाल जिंदाल फिजिओथेरपी, डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय, सूर्यदत्ता संस्था, ससून रुग्णालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, नवले शिक्षण संस्था आणि सेवांकुर भारत या संस्थांतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या शिबिरांमध्ये वारकऱ्यांना फिजिओथेरपी, थकवा कमी करणाऱ्या मसाज सेवा, तसेच मानसिक ऊर्जा वाढवणाऱ्या संवादात्मक सत्रांद्वारे उपचार देण्यात आले. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकलेल्या वारकऱ्यांना या सेवेचा मोठा आधार मिळाला.
वारकऱ्यांची सेवा म्हणजेच विठ्ठलसेवा या भावनेतून पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने समाजाभिमुख उपक्रमाची यशस्वी अमलबजावणी केली आहे.






























